Thursday, November 4, 2010

सप्तक ही संकल्पना भारतीय संगीतात प्राचीन काळापासून ज्ञात आहे. पाश्चात्य व इतर संगीतातहि ती आहेच कारण ती एक मूलभूत संकल्पना आहे. भरतमुनीच्या काळापासून उत्तरी व दक्षिणी दोन्ही संगीतपद्धतींत सप्तकाचे अनेक प्रकार प्रचारात होते. षट्जग्राम, मध्यमग्राम, गंधारग्राम अशी नावे प्रचारात होतीं. मूर्छना ही संकल्पना बहुधा फक्त भारतीय संगीतातच वापरली गेली असावी. कोणतेही एक सप्तक ’मूळ सप्तक’ ठरवले तर त्यातील एकेका स्वराला क्रमाने सा बनवला पण सर्व स्वरांचीं परस्परांतील गुणोत्तरे कायम ठेवलीं तर एकेक नवीनच सप्तक बनते त्यामुळे एका सप्तकातून सात वेगवेगळी सप्तके मिळतात. या प्रकाराला मूर्छना म्हणतात असे मी वाचलेले आहे. पण हा सर्व इतिहास झाला. असे अनेक प्रयोग करत व बदल होतहोत उत्तरी संगीतात सध्या प्रचारात असलेले व सर्वमान्य असलेले आधारभूत शुद्ध सप्तक बनले आहे. यांतील स्वरस्थाने नैसर्गिक व स्वयंभू आहेत. पाश्चात्य संगीतातहि हेच सप्तक वापरले जाते. या स्वरांमध्ये कंपनसंख्यांचे गुणोत्तर अनुक्रमाने ९/८, १०/९, १६/१५, ९/८, ९/८, १०/९ व १६/१५ असे असते.
सप्तकात सातच स्वर असले तरी सा पासून वरच्या सा पर्यंत मध्ये इतरहि पुष्कळ स्वरांना जागा आहे व त्यांतील काही स्वर निश्चितपणे संगीतोपयोगी आहेत हे ओळखून त्यांचा वापर करण्यासाठी २२ श्रुतींची संकल्पना भारतीय संगीतज्ञांनी निर्मिली. भरतमुनींनी सप्तकांतील मूळ शुद्ध स्वरांमध्ये २२ श्रुतींची वाटणी ४-३-२-४-४-३-२ अशी केली होती. दोन स्वरांमधले अंतर ’मोठे’, ’कमी मोठे’ व ’अर्धे’ हे दाखवण्यासाठी ९/८, १०/९ व १६/१५ या गुणोत्तरांसाठी ४, ३ व २ श्रुति हे आकडे घेतलेले आहेत पण त्यांचा ’गणिती’ अर्थ अभिप्रेत नव्हता. याच गुणोत्तरांना पाश्चात्य ’मेजर टोन’, ’मायनर टोन’ व ’सेमि टोन’ म्हणतात.

No comments:

Post a Comment