Wednesday, December 1, 2010

सात शुद्ध स्वरांची स्थाने ४-३-२-४-४-३-२ या श्रुत्त्यंतरांनी निश्चित आहेत. मग तीव्र-कोमल स्वर कोणत्या श्रुतिस्थानी व किती सेंट्सवर घ्यावयाचे? रिषभ चौथ्या श्रुतीवर असल्यामुळे कोमल रिषभ दुसर्‍या श्रुतीवर योग्य ठरतो. पण पहिल्या व तिसर्‍या श्रुतीवरहि कोमल रिषभाचे इतर प्रकार संभवतात. सा पासून ११२ सेंट्सवर दुसरी व १८२ सेंट्सवर तिसरी श्रुति मानणे सयुक्तिक वाटते. प्रश्न उरतो तो पहिली श्रुति (अति कोमल रिषभ) किती सेंट्सवर असावी. असाच प्रश्न पांचव्या श्रुतीचा. सहावी श्रुति रिषभाचे पुढे ११२ सेंट्सवर (कोमल गंधार) व सातवी श्रुति, शुद्ध गंधाराची, रिषभाचे पुढे १८२ सेंट्सवर आहे. अशाच प्रकारे, ८, १०, १४, १७, व २१ क्रमांकाच्या श्रुतींच्या स्थानाबद्दलहि निश्चिति नाही. या सातहि श्रुति, शुद्ध स्वरांचे लगेच पुढच्या आहेत. त्यामुळे त्यांचे स्थान ’एक श्रुति म्हणजे किती सेंट्स?’ या प्रश्नाचे उत्तरावर अवलंबून आहे. ९० सेंट्स हे एक त्याचे उत्तर आहे. दोन प्रकारानी हे उत्तर मिळते.
मध्यम = ४९८ सेंट्स. मध्यमाचा मध्यम ९९६ सेंट्सवर येईल. असे आणखी तीनदां केले तर ९९६ + ४९८ +४९८ + ४९८ = २४९० सेंट्सवर पोंचलो. हा स्वर दोन सप्तके ओलांडून तिसर्‍या सप्तकात आहे. मध्यमाच्या ९ श्रुति ५ वेळा घेतल्यामुळे ४५व्या श्रुतीवर पोचलो आहोत. दोन सप्तकांच्या २२ x २ = ४४ श्रुती ओलांडून तिसर्‍या सप्तकाच्या ’पहिल्या’ श्रुतीवर पोंचलो आहोत आणि दोन सप्तकांचे १२०० x २ = २४०० सेंटच्या पुढे ९० सेंट्सवर पोंचलो तेव्हां ही श्रुति = ९० सेंट्स !
पंचम = ७०२ सेंट्स. पंचमाचा पंचम १४०४ सेंट्सवर किंवा वरच्या सप्तकांत २०४ सेंट्सवर (वरचा शुद्ध रिषभ) येईल. असे एकून ५ वेळा केले तर ३५१० सेंट्सवर पोचतो. पंचमाच्या १३ श्रुति पांच वेळा घेतल्यामुळे ६५व्या श्रुतीवर पोचतो. म्हणजे अति-अति तार षट्जाच्या, (६६व्या श्रुतीच्या), एक श्रुति मागे आहो. ही ६६ वी श्रुति १२०० x ३ = ३६०० सेंट्सवर येईल. एक श्रुति मागे आणि ९० सेंट्स मागे म्हणून १ श्रुति = ९० सेंट्स!
एका श्रुतीची ९० सेंट्स ही किंमत मानली तर सर्व २२ श्रुतींची स्थाने षट्जापासून क्रमाने सेंट्समध्ये नक्की ठरतात. ती अशीं -
०(सा),९०,२२,७०,२२(रे),९०,२२,७०(ग),९०,२२(म),९०,२२,७०,२२(प),९०,२२,७०,२२(ध),९०,२२,७०(नि)९०,२२(सां)
(सा, रे, ग, म. प, ध, नि, सां या शुद्ध स्वरांची स्थाने त्या-त्या श्रुतीपुढे कंसात दाखवली आहेत.)
या सर्व २२ श्रुति संगीतोपयोगी आहेत काय व कोणत्या रागात कोणत्या श्रुतीवरील तीव्र-कोमल स्वर घ्यावयाचे हे संगीतज्ञांचे काम आहे. तसेच शुद्ध स्वरांच्या लगेच पुढच्या श्रुतीची ९० सेंट्स ही किंमत योग्य आहे काय हे प्रत्यक्ष प्रमाणाने त्यानीच ठरवावयास हवे.