Thursday, October 28, 2010

फार पूर्वीपासून मला या विषयात कुतूहल होते. संगीत आणि आयुर्वेद हे रोजच्या व्यवहारातले असे दोन विषय आहेत कीं ज्याबाबत भारत पूर्वापार स्वयंपूर्ण आहे. एका सप्तकात बावीस श्रुति वा स्वर ही भारतीयांची स्वयंभू पद्धत आहे. तिला कसलाहि परदेशी मूलाधार नाहीं. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून अनेक जुन्या ग्रंथात याबद्दल विवेचन आहे. मात्र त्यामागील गणिती संकल्पना स्पष्ट केलेल्या नाहीत. स्वराचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याची कंपनसंख्या असा स्पष्ट सिद्धान्त मांडलेला आढळणार नाही. मात्र एखाद्या ताणलेल्या तारेतून वा तंतूतून उत्पन्न होणार्‍या स्वराची ’उंची’ तारेची जाडी वा वजन, तारेवरील ताण व कंप पावणारी लांबी या गोष्टींवर अवलंबून असते हे नक्कीच प्राचीन काळापासून माहीत होते. लांबी वाढली तर स्वर उतरतो, ताण वाढला तर चढतो हेहि माहीत होते. या घटकांचे परस्पर नाते सांगणारा विज्ञानाचा सिद्धांत मात्र (बहुधा) माहीत नसावा. संगीतकलेच्या प्रगतीबरोबर संगीताचे शास्त्रहि बनत गेले असले पाहिजे. त्यातील सर्व पायर्‍या आता समजणे शक्य नाही. षट्ज, त्याचा वरचा षट्ज व त्यामध्ये सहा इतर सूर मिळून सप्तक ही संकल्पना प्रथम स्थिर झाली असावी व मग या स्वरांच्या दरम्यान इतरहि अनेक स्वर असतात व त्यांतील काही संगीतोपयोगी असतात ही त्यापुढची पायरी मानली पाहिजे.
या लेखातील आशय इंग्लिशमध्ये पुढील लेखात दिसेल.

No comments:

Post a Comment